साहित्य
1 टेबलस्पून वनस्पती तूप,
1 वाटी पिठीसाखर,
2 वाट्या मैदा,
1/4 टिस्पून मीठ,
गुलाबी रंग,
डालडा.
सारण
दोन टीस्पून कॉर्नफ्लॉवर,दोन टीस्पून तूप.(दोन्ही फेसून घ्यावे.)
कृती
मैद्यात मीठ व तूप एकत्र करावे व त्याचे तीन भाग करावेत.
पाणी घालून दोन भागांचे घट्ट पीठ भिजवावे.
एका भागात गुलाबी रंग घालावा व नंतर पाणी घालून घट्ट पीठ भिजवावे. एक तास पीठ झाकून ठेवावे.
नंतर चांगले मळून घ्यावे व सफेद पिठाच्या दोन गोळ्या कराव्यात व गुलाबी रंगाची एक गोळी करावी.
तिन्ही गोळ्या निरनिराळ्या लाटून घ्याव्यात. पोळी पेक्षा थोड्या जाडसर लाटाव्यात.
प्रथम गुलाबी पोळी घेऊन पोळीला कॉर्नफ्लॉवर व तुपाचे सारण थोडे चोळून सगळीकडे पसरावे व पोळी गोल गुंडाळून तिची सुरळी करावी.
नंतर सफेद पोळी घेऊन तिला सारण लावावे व तिच्यावर दुसरी सफेद पोळी टाकावी व दुसऱ्या पोळीलाही सारण लावावे.
नंतर दोन्ही पोळ्यांच्या काठावर गुलाबी रंगाची सुरळी ठेवावी सुरळीसह दोन्ही पोळ्या एकदम गुंडळाव्त व तिन्ही पोळ्यांची एकच सुरळी तयार करावी.
नंतर सुरीने सुरळीच्या छोट्या छोट्या गोळ्या कापाव्यात व सुक्या मैद्यात घोळवून एकेक गोळी जाडसर अलगद लाटावी.
याप्रमाणे सर्व गोळ्या लाटून घ्याव्यात. लाटताना शक्यतो मैदा कमी वापरावा.
कढईत तूप तापल्यावर गॅस बंद करावा एकेक पुरी तुपात सोडावी.
तळताना झाऱ्याने पुरीवर तूप उडवत राहावे म्हणजे चिरोटा चांगला फुलून येईल.
चिरोटा थोडा कडक झाला की परतावा व दोन्ही बाजूने कडक झाला की बाहेर काढावा.
चिरोटेची तळाची बाजू पिठीसाखरेत घोळवून चिरोटा ताटात काढून ठेवावा.
याप्रमाणे सर्व चिरोटे करावेत.चिरोटा जास्त तळून लाल करू नये.
रंग दिसणार नाहीत. तसेच चिरोटे तळताना तूप थंड झाले की गॅस थोडा मोठा करावा.
तूप थंड झाल्यावर चिरोटे विरघळू लागतात.